पुणे : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळील भुमकर चौक येथे रविवारी झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भूमकर चौक ते वडगाव पुल सेवा रस्त्यावरील बेकायदा अतिक्रमणे हटविण्यात आली असून ही कारवाई पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने आज सकाळी करण्यात आली. यावेळी पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्यासह जेसीबी, वाहनाच्या साह्याने बेकायदा अतिक्रमणे पाडण्यात आली.
यावेळी सिंहगड रस्ता पोलीस विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुनिल पवार, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड, आकाश चिन्ह निरीक्षक युवराज वाघ, अजित जोगळेकर आदी अधिकारी उपस्थित होते. भूमकर चौकापासून सुरू करण्यात आलेली कारवाई थेट वडगाव पुलापर्यंत करण्यात आली. यावेळी दुकाने, हॉटेल, विविध व्यवसायिक यांच्याकडून करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले.
कारवाई आधी पोलिस, महापालिका, रस्ते विकास महामंडळ यांच्या पथकाने सोमवारी घटना स्थळाची पाहणी करून तत्काळ करण्याच्या उपाययोजना सुचविल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नवले पुल परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
महापालिकेचे शेकडो कर्मचारी यांनी कामाला सुरुवात केली. त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिका अतिक्रमण विभाग पोलिस बंदोबस्त तसेच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे सुमारे 100 हून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर होते.
दंड न भरल्यास मिळकतकरावर बोजा
महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक 3 चे उपआयुक्त जयंत भोसेकर यांचे मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड यांचे नियंत्रणाखाली भुमकर चौक सर्विस रस्ता ते नवले ब्रिज येथे अनाधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत ३८०० चौरस फुटाचे एकूण 3 पाठपोट जाहिरात फलक कारवाई करून काढण्यात आले आहेत सदर जाहिरात फलक असलेल्या जागांच्या मालकांकडून प्रत्येकी ५०,००० रुपये प्रमाणे दंड वसूल करण्याची कार्यवाही चालू करण्यात आली आहे विहित मुदतीत संबंधितांनी या रकमेचा भरणा पुणे महानगरपालिकेमध्ये न केल्यास त्यांच्या मिळकत करा वरती सदरचा बोजा चढवण्यात येणार आहे.
या कारवाईमध्ये आकाश चिन्ह निरीक्षक युवराज वाघ, अजित जोगळेकर यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईमध्ये एक गॅस कटर एक क्रेन चालक व आठ बिगारी उपस्थित होते.