पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील किवळे येथे अनाधिकृत होर्डिंग कोसळून पाच मुजरांचा मृत्यू झाला होता या दुर्घटनेनंतर महापालिका ॲक्शन मोडवर आली. महापालिकेची परवानगी न घेता लावलेल्या हाेर्डिंगवर कारवाई करून हाेर्डिंगधारकांवर महापालिका प्रशासनाने यापूर्वी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान आता महापालिकेकडून पिंपरीतील 100 होर्डिंगधारकांना नोटीसा धाडण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात सद्य:स्थितीत सुमारे एक हजार ४०० हाेर्डिंग अधिकृत असल्याचा दावा आकाशचिन्ह व परवाना विभागाने केला आहे. किवळे दुर्घटनेनंतर प्रशासनाने हाेर्डिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असली तरी हाेर्डिंगधारकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे.दरवर्षी परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक असताना नूतनीकरणास होर्डिंग धारकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता महापालिका ॲक्टिव मोडवर आली असून परवाना नूतनीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या १०० हाेर्डिंगधारकांना नाेटिसा देण्यात आल्या आहेत. ३१ मार्चपूर्वी नूतनीकरण न केल्यास संबंधित हाेर्डिंग अनधिकृत समजून कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
दरम्यान महापालिकेच्या नोटीसा मिळताच शंभरपैकी ४० हाेर्डिंगधारकांनी परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. मात्र, अद्याप ६० जणांनी अर्ज केलेले नाहीत. त्यांनी ३१ मार्चपूर्वी परवान्याचे नूतनीकरण करून घ्यावे, अन्यथा हाेर्डिंग अनधिकृत समजून कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.