पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज त्यांनी आपल्या पीएद्वारा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या कडे सोपवला. त्यानंतर आता राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला असून धनंजय मुंडे यांच्या जागी कुणाची एन्ट्री होणार?असा सवाल विचारला जात असताना मंत्रीपद न मिळालेले नाराज छगन भुजबळ यांची सरकारमध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती.अशातच या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीत आता धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर अजित पवार यांनी पाठिंबा दर्शवला अन् अखेर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या राजीनाम्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे, हे मला आत्ताच समजलं. यासंदर्भात आता पुढची जी काही भूमिका पक्षाचे अध्यक्ष अजित पवार लवकरच जाहीर करतील, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.