दौंड : दौंड पोलीस ठाण्याच्या समोरून दुचाकींची चोरी करणाऱ्या एका 22 वर्षीय चोरट्याला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अमजद गफूर खान (वय 22,रा. नेहरू चौक, दौंड) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्याच्या समोर तुषार संदीप भागवत (रा. दौंड) यांनी गुरुवारी (ता. 20, फेब्रुवारीला) दुचाकी लावली होती. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास लावलेल्या ठिकाणी दुचाकी आढळून आली नाही. चार – पाच दिवस परिसरात शोध घेतला मात्र कोठेही आढळून आली नाही. त्यामुळे भागवत यांनी दौंड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद दिली होती.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सदरची दुचाकी नेहरू चौकात राहणाऱ्या अमजद याने चोरी केली आहे. पोलिसांनी अमजद यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पोलीस ठाण्याच्या समोरून दुचाकी चोरल्याचे कबूल केले. तसेच दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5 दुचाकी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस हवालदार नितीन बोराडे, सुभाष राऊत, किरण राऊत,अमीर शेख यांच्या पथकाने केली आहे.