पुणे : राज्यात पुन्हा सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. पण आजच्या अधिवेशनात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी 2100 रुपये बाबत केलेल्या वक्तव्याने लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेद्वारे 2100 रुपये देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. यावरून सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत 2 कोटी 54 लाख महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा लाभ येत्या 8 मार्चच्या पूर्वसंध्येला होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधान परिषदेत दिली. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनिल परब यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्यांनीअधिवेशनाच्या काळात किंवा अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याची घोषणा करू असं कुठलंही वक्तव्य करण्यात आलं नव्हतं असं उत्तर दिले.यावरून महायुती सरकारने लाडक्या बहिणींना ठेंगा दिला असल्याचं दिसून येत आहे.
याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या, राज्याची योजना सरकारकडून जाहीर केली जाते आणि जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो.योग्य पद्धतीने त्या संदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन,मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ सूचित करेल त्यावेळी तसा प्रस्ताव शासनाकडे ठेवू असं त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.