पुणे : महाराष्ट्रातील साखर उद्योगातील कामगारांची वेतनवाढ व सेवा-शर्तीबाबतच्या राज्य पातळीवर झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपली आहे. साखर कारखान्यांतील कामगारांच्या वेतनवाढीकडे राज्य सरकार पूर्ण दुर्लक्ष करत आहे. साखर कामगारांचे थकीत वेतन मिळण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी साखर कामगारांनी अखेर 16 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिलेला आहे.
साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची गुरुवारी (दि.28) पुण्यात बैठक झाली. या बैठकीला अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्यासह सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, राज्य साखर कामगार महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड पी. के. मुंडे, आनंदराव वायकर आदींसह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कळवली आहे.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ ही साखर उद्योगातील नोंदणीकृत व मान्यताप्राप्त मंडळ आहे. राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील सर्व कामगारांच्या पगारवाढीच्या कराराची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपली आहे.