छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगरातील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासून शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. याचवेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा गोंधळ उडाल्याचेही पाहायला मिळाले आहे. दर्शनासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या तरूणांची जबर हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. भाविकांनी एकमेंकाना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनाच्या रांगेत पुढे जाण्यासाठी भाविकांमध्ये हाणामारी झाली. तर व्हीआयपी दर्शन रांगेतून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सहकुटुंब जात असताना त्यावेळी सार्वजनिक रांगेत उभे असलेले काही भाविक बॅरेगेट्स ओलांडून दानवे यांच्या मागे गेले. हा गोंधळ पाहून दानवे देखील माघारी परतले आणि काही वेळ बाहेर थांबले होते. पोलीस आणि प्रशासनातील समन्वयांचा अभाव व नियोजनाचा अभाव या माध्यमातून दिसून आल्याची टीका दानवे यांच्याकडून करण्यात आला आहे. दिवसभरात नागरिकांचा फ्लो वाढेल त्यामुळे व्यवस्था चांगली करावी, अशी सूचना यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
बारावे ज्योतिर्लिंग..
सिद्धेश्वर मंदिर महाशिवरात्री बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने आज पहाटेपासूनच शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणारे आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे ज्योतिर्लिंग म्हणून घृष्णेश्वरांची ओळख आहे. चार धाम सप्त पुरी, ११ ज्योतिर्लिंग यांची यात्रा केल्यानंतर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वरांचे दर्शन करून यात्रा पूर्ण करतात. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने हा योग मोठा असल्यामुळे देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने भाविक भक्त घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी येत आहेत.