लोणी काळभोर,(पुणे):, ता.28: लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या समोच्या परिसरात पार्किंगची (Loni Kalbhor Police station parking issue) समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी बिनधास्तपणे रस्त्याच्या बाजूला चारचाकी व दुचाकी वाहने पार्क करीत आहेत.
त्यामुळे या ठिकाणी खरेदीसाठी व पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पार्किंगच्या कारणातून दुकानदार व काही नागरिकांमध्ये किरकोळ वादाच्या घटनाही घडत आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या बाजूलाच नामांकित महाविद्यालय परिसरातील सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय, भाजी मंडई, असा परिसर असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. तसेच प्रसिद्ध रामदरा शिवालयकडे जाणारे भाविक याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर कायम वाहतुकीची वर्दळ असते. शाळा, महाविद्यालय व परिसरातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे.
याच ठिकाणी लोणी काळभोर पोलिसांनी चोरीच्या, अपघातग्रस्त व जप्त केलेल्या मोटरसायकल आणि अन्य वाहने धूळ खात पडून आहेत. ही वाहने महिनोनमहिने एकाच जागेवर असून, त्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे लोणी काळभोर गावातून पुणे – सोलापूर महामार्गावर जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी होत असते. या मुख्य रस्त्यावर वाहनांची अनधिकृत पार्किंग दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने लोणी गावात जाणाऱ्या वाहनचालकांना वाहन चालवताना अडचणी येत आहेत.
अपघात व इतर गुन्ह्यातील वाहनांचा खच
अपघात झालेले बेवारस वाहने तसेच चोरीला गेलेली वाहने चोरट्यांकडून हस्तगत केलेली तसेच विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेली लाखो रुपयांची वाहने आवारात उभी असून यातील अनेक वाहनांना अक्षरशः गंज चढलेला आहे. यामुळे पोलीस ठाण्यांच्या बाहेर या रस्त्यावर भंगार बाजाराचे स्वरूप आले आहे. वाहनांचे भाग चोरीला जाण्याची भीती असल्याने पोलिसांना डोळ्यात तेल घालून लक्ष घालावे लागत आहे.
आठवडे बाजारादिवशी मोठी वाहतूक कोंडी..
या अपघातग्रस्त, चोरीच्या, व जप्त केलेल्या वाहनांमुळे लोणी काळभोर गावातून पुणे – सोलापूर महामार्गावर जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असून शनिवारच्या आठवडे बाजारादिवशी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. अपघातग्रस्त वाहनांमुळे व पोलिसांच्या वाहनांमुळे वाहने रस्त्यावरच उभी करण्यात येतात. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे.
दरम्यान, मुख्य रस्त्यावरील व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या समोरील बहुतांशी व्यावसायिक पोलीस अधिकाऱ्यांना काहीच बोलत नाहीत. त्यामुळे पार्किंग नसल्याने ग्राहक त्या ठिकाणी थांबत नाही. त्याचा परिणाम येथील व्यावसायिकांच्या व्यवसायावरही होत आहे. त्यामुळे भविष्यात येथील बाजारपेठ संपुष्टात येण्याची भीती व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांसह नागरिकांकडून होत आहे.