लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे खुलेआम सुरु असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता.26) पावणे सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी एकाला अटक करून सुमारे 2 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आहे.
शिवाजी सैदाप्पा वनकर (वय 43, रा. 12 फाटा कुंजीरवाडी ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी दरेकर यांनी सरकारच्यावतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार शिवाजी दरेकर यांना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाराफाटा चौकाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत खुलेआम मटका जुगार सुरु आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा वरील आरोपी शिवाजी वनकर हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार पैशांवर खेळत असताना मिळुन आले.
दरम्यान, पोलिसांनी या छाप्यात आरोपी शिवाजी वनकर याच्यावर महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंधक अधिनियमन कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 2 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विशाल बनकर करीत आहेत.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस हवालदार योगेश कुंभार, तेज भोसले, पोलीस अंमलदार शिवाजी दरेकर, संदीप धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.