जेजुरी – जेजुरी नगरपालिकेचे सांस्कृतिक भवन पाडून त्याजागी होणार अत्याधुनिक नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. या निर्णयाला पुरंदरचे आमदार संजय जगताप, जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी हिरवा कंदील दिला आहे.
जेजुरी नगरपालिकेचे सांस्कृतिक भवन हे तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी पाडण्यास सुरुवात झाली. यावेळी पुरंदर मनसेचे अध्यक्ष उमेश जगताप यांनी याला विरोध केला. बहुद्देशीय कार्यलय प्रथम उभारावे, अशी मागणी केली.
पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी लवकरच जेजुरी पालिकेच्या इतर जागेत सुसज्ज सांस्कृतिक भवन उभारले जाईल, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, जेजुरी नगरपालिकेच्या जागेत सांस्कृतिक भवन उभारण्यात आले होते. या जागेत शासनाच्या सुमारे ४ कोटी २५ लाख रुपये खर्चून आधुनिक पद्धतीचे नाट्यगृह उभारले जात आहे, यासाठीची सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हे सांस्कृतिक भवन पडल्यास सर्वसामान्य नागरिकांना लग्नकार्य,साखरपुडा,विविध छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी कोठेही सभागृह उपलब्ध नसल्याने मनसे, भाजपा व नागरिकांनी विरोध केला होता.