बापू मुळीक
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त भारत इंगुले यांची राज्य शासनाकडून नुकतीच श्रेणी एक पदी उपआयुक्त पदी पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांची पदोन्नती झाली असली, तरी ते जेजुरी नगरपरिषदेचा कारभार पाहणार आहेत.
मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले हे मूळचे बारामती येथील असून, बी टेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका त्यांनी घेतली आहे. यापूर्वी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगरपालिकेत तीन वर्ष मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे. जेजुरी येथे अडीच वर्ष ते कार्यरत आहेत. जेजुरी नगरपालिकेत प्रशासकीय काळात जेजुरीकर नागरिकांच्या सहकार्यातून वीर धरणातून, जेजुरी शहराला कायमस्वरूपी पाणी मिळावे, यासाठी सुमारे अष्टयात्तर कोटी रुपयाच्या पाणी योजनेत मंजुरी मिळाली आहे .तसेच सुमारे 10 कोटी रुपयाचे मल्हार नाट्यगृह, ऐतिहासिक होळकर तलावासाठी, अहिल्यादेवी उद्यान, ओपन जिम, भाजी मंडई, दुष्काळात तातडीची मांडकी डोहावरील पाणी योजना सुरू करणे, आदी मोठी विकासाची कामे राबवली असल्याचे मुख्याधिकारी इंगुले यांनी सांगितले.
मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांच्या पदोन्नतीबद्दल पालिकेचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, जेजुरी शहर पत्रकार संघ, विविध संस्था, तसेच जेजुरीकर नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.