जळगाव : बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांनं संपूर्ण राज्यात वातावरण तापलं असताना आता जळगावमध्ये माजी उपसरपंचाची भर दिवसा निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.युवराज सोपान कोळी असे मयत उपसरपंचाचे नाव आहे..शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी यांच्यावर गावातील तिघांनी हल्ला चढविला आहे . चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार केल्याने कोळी हे प्रचंड जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. माजी उपसरपंचाची हत्या करणाऱ्या तीनही मारेकऱ्यांचा कसून शोध सुरू असून पोलिसांनी त्यांच्या शोधार्थ पथकही रवाना केलं आहे.
जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांच्या प्रचंड आक्रोशाने वातावरण अगदी सुन्न झालं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.