अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. अशातच आता लग्न मोडल्याच्या कारणावरून 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलासह आई-वडिलांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरमधील जामखेड पोलीस ठाणे परिसरात लग्न मोडल्याच्या कारणावरून तरुणीने टोकाचे पाऊल उचललं आहे. मोनिका सतीश सुरवसे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.मोनिका सुरवसे हिचं लग्न महेश मेंगडे याच्याशी जमलं होतं. मात्र लग्न जमल्यानंतर, ‘तू मला आवडली नाही. मला तू शोभत नाही’, असे म्हणत महेशने मोनिकाचा अपमान केला आणि लग्न मोडले. लग्न मोडल्याच्या मानसिक तणावाखाली तरूणीने टोकाचे पाऊल उचलले. तिने गळफास घेत आयुष्य संपवले. याबाबत मुलीचे वडील सतीश दादासाहेब सुरवसे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.
दरम्यान याप्रकरणी तरूणासह त्याच्या आई वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनवलकर करीत आहेत.