पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोंदूबाबांने एका महिलेला घरावर संकट येणार असल्याचे सांगून लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भोंदूबाबाने लुटल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीसात धाव घेतली आणि भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले आहे.
या प्रकरणातील महिलेने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारी नुसार, दोन वर्षांपूर्वी महिला आपल्या पतीला घेऊन खेडच्या कण्हेरसर मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी निळकंठ सूर्यवंशी त्यांना भेटला. दारूचे व्यसन असणाऱ्या महिलेच्या पतीने भोंदूबाबाच्या सांगण्यावरून दारू सोडली. यानंतर महिलेला भोंदूबाबावर विश्वास बसला. त्यानंतर या प्रकरणातील आरोपीने महिलेच्या मोबाईल क्रमांकावर 25 मार्च रोजी संपर्क साधला आणि घरावर संकट येणार असल्याचे सांगितलं. घरावरील संकट परतवून लावण्याच्या बहाण्याने सूर्यवंशीने महिलेला हडपसर गाडीतळ परिसरात बोलवुन घेतले व येताना मंगळसूत्र,मुलीची सोनसाखळी घेऊन येण्यास सांगितले, ते तुम्हाला दागिने मंतरुन देतो असं सांगितल्यानंतर महिलेने सूर्यवंशीची भेट घेतली.दागिने मंतरून त्याने प्लास्टिक पिशवीत ठेवले. नंतर आरोपी दागिने घेऊन पसार झाला. महिलेला कळताच तिने पोलीस धाव घेतली आणि भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी आणि पथकाने पसार झालेल्या सूर्यवंशीला पकडून त्याच्याकडून चोरलेले दागिने जप्त केले. सूर्यवंशीने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.