हनुमंत चिकणे
शिक्रापूर : रात्रीच्या वेळी महामार्गावर उभे असणाऱ्या वाहनांचे डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला शिक्रापूर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद करत तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी डीझेल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आले असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली आहे .
सुनिल रामचंद्र दुबे (वय 35, रा. काळेपडळ, हडपसर), सुभाष दगडु मालपोटे (वय – 43, रा. कातरखडक, ता. मुळशी), संदिप तुळशिराम वाघमारे, (वय 23, रा. खांबोली, ता. मुळशी), ओंकार शिवाजी घाडगे (वय 22, रा. जोगेश्वरी कॉलनी, काळेपडळ, म्हसोबा मंदिरा शेजारी, हडपसर) कुणाल सोमनाथ पवार, (वय -27, रा. माळवाडी, सुजलोन कंपनी शेजारी, हडपसर), गणेश भाऊसाहेब मुरकुटे (वय 46, रा. शिरसवडी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींना सोमवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर संभाजी थोटे, (रा.पायतळवाडी, ता.माजलगाव, जि. बीड) हे ट्रक घेऊन रात्रीच्या वेळी हायवे रोडने निघाले होते. यावेळी लंघुशंकेसाठी, कासारी फाटा, ता. शिरूर येथे थांबले होते. यावेळी एका विना नंबरच्या स्विफ्ट कारमधून तिघेजण खाली उतरले व त्यांनी फिर्यादी यांचे ट्रकचे दरवाज्यावर दगडफेक करण्यास सुरूवात केली. फिर्यादीला धमकावून ट्रकच्या डिझेल टाकीतील 4 हजार 462 रुपयांचे तब्बल 470लिटर डिझेल चोरी करून पसार झाले होते. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डिझेल चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. संशयित स्विफ्ट आणि आय-20 कारचा शोध घेत असताना कोरेगाव भीमा येथे एका विना नंबरच्या स्विफ्ट कारची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सापळा रचला. संशयित कारमधील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी डिझेल चोरीची कबुली दिली आणि इतर आरोपींची माहिती दिली. पुढील तपासात पोलिसांनी एकूण 6 आरोपींना अटक केली असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. सदर आरोपींना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने सोमवारी पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी ठोठावली आहे.
दरम्यान, आरोपींकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली 1 स्विफ्ट कार, 1 आय 20 कार, 35 लिटर मापाचे 15 प्लॅस्टिक कॅन, 2 हिरवे पाईप असा एकुण 10 लाख 2 हजार 705 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपींनी एकुण 5 ठिकाणी डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक लहानु बांगर, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, नारायण वाळके यांचे पथकाने केली आहे.