पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांचा काल राजीनामा झाला. आता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधीलग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे एका प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जिल्हा परिषद ते कॅबिनेट मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार गोरे हे 2016 मध्ये आमदार असताना त्यांनी एका महिलेला त्रास देत व्हाट्सअप वर विवस्त्र फोटो पाठवल्याच प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जयकुमार गोरे यांना बडतर्फ करण्यासाठी त्या पीडित महिलेसोबत राज्यपालांकडे जाणार असल्याचं म्हटलं आहे.
जयकुमार गोरे यांची राजकीय कारकीर्द…
जयकुमार गोरे आमदार होण्यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि आता मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. तर, जयकुमार गोरे प्रथम काँग्रेस आणि आता भाजपमध्ये कार्यरत आहेत. जयकुमार गोरे पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील माण खटाव विधानसभा मतदारसंघातून 2009 ला अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर जयकुमार गोरे 2014 ला काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झाले होते. मात्र, 2014 ते 2019 ची टर्म पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.त्यांनी 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. या विधानसभा निवडणुकीत माण खटाव मतदारसंघातून ते चौथ्यांदा विजयी झाले.ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सध्या माण खटावचे आमदार आहेत
दरम्यान जयकुमार गोरे यांच्यावर यापूर्वी मायणी येथील कोविड सेंटरमध्ये 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधी वाटपात घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर खटाव येथील एका व्यक्तीच्या जमिनीबाबत खोटी कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्या प्रकरणी ते अडचणीत आले होते. त्यानंतर आता 2016 मधील महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा प्रकरण त्यांचं पुन्हा एकदा चर्चेत आल आहे. त्यामुळे ते चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.