लोणी काळभोर : एका थार चालकाने लोणी काळभोर (ता.हवेली) येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात धोकादायकरीत्या स्टंटबाजी केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अखेर ”त्या” थार चालकासह दोघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पृथ्विराज संजय चव्हाण (वय 20, रा. फ्लॅट नं. जी-1/26 हर्स हेरिटेज, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे) व रोहन युवराज दळवी (वय 22, रा. प्लॉट नं. ए 79, कमलबाग सोसायटी. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तात्यासाहेब दशरथ पवार (वय 52, रा. फ्लॅट नं. 401, स्वामी कुंज बिल्डींग, संभाजी नगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्विराज चव्हाण याने बिगर नंबरप्लेट व संपूर्ण काचा काळ्या असलेली थार गाडी थेट एमआयटी शैक्षणिक संकुलात गुरुवारी एक वाजण्याच्या सुमारास घातली. त्यानंतर स्टंटबाजी करुन भरधाव वेगाने गाडी चालवली. तसेच रोहन दळवी याने त्याला या प्रकरणात साथ दिली. यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला होता.
त्यानंतर सेक्युरिटी गार्ड त्या थारच्या पाठीमागे जवळपास पंधरा मिनिटे मागे पाळल्यानंतर थार गाडी अडविली. मात्र थार मधून कोणीही खाली उतरले नाही. त्यानंतर या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत थारमधील दोन्ही आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी दोघांवर भारतीय न्याय संहिता कायदा २८१, १२५. ३(५) मोटार वाहन कायदा कलम ५०/१७७, १००(२)/१७७, १८४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर
लाखो रुपयांचे शैक्षणिक शुल्क भरून देशाच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून हजारो विद्यार्थी लोणी काळभोर येथील एम आय टी शैक्षणिक संकुलात शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र थारच्या घडलेल्या प्रकारामुळे संकुलातील एमआयटीच्या सुरक्षेची अवस्था बिकट असल्याची दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर एमआयटी काम करणाऱ्या सेक्युरिटी गार्डच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे