पुणे : महायुती सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल असं सांगण्यात आलं होतं. काल जागतिक महिलादिनी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले त्यामुळे संभ्रम निर्माण झाला.मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? या चर्चेला उधाण आलं.सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप ही विरोधकांकडून करण्यात आला यावर आता मंत्री अदिती तटकरे यांनी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. ७ मार्च २०२५ पासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून १२ मार्च २०२५ पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केल आहे.
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे की, “लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया ७ मार्च २०२५ पासून सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये व मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावं”, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना 2100 रुपये देण्याच आश्वासन महायुतीने दिले असले तरी जाहीरनामा पाच वर्षासाठी असतो असे सांगत योग्य वेळी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.