पुणे : राज्यात भाजप- शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस महायुती विजय होऊन जेमतेम तीन महिने उलटले असताना त्यांच्यातील अंतर्गत कलह आता दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या अनेक निर्णयाची चौकशी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता आरोग्य विभागातील त्यांच्या या निर्णयाची चौकशी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या निर्णयाची चौकशी होत आहे. आरोग्य विभागातील तीन हजार दोनशे कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. साफसफाईच्या कामाचे कंत्राट एका अनुभव नसलेल्या कंपनीला दिले असल्याने ही स्थगिती दिल्याची माहिती आता समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे संशयाच्या फेऱ्यात आहेत. त्यामुळे तानाजी सावंत यांची देखील चौकशी केली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाने घेतलेल्या सर्व निर्णयाशी चौकशी केली जाणार आहे. यामध्ये कोणत्या कामासाठी किती निधी घेतला याचीही चौकशी केली जाणार आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारमध्ये कोणताही निर्णय घेताना असं कोणतंही काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले नाही जिथे सरकार अडचण येईल. तुमच्या या निर्णयाच आम्ही स्वागतच करतो. एकनाथ शिंदे यांच्या काळात घोटाळे झाले असं वाटत असेल तर पत्र द्या, त्या सगळ्याची चौकशी करू आम्ही चौकशीला समोर जायला तयार आहोत, घाबरत नाही असे स्पष्ट त्यांनी सांगितलं.