पुणे : राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. या योजनेतून आतापर्यंत जुलै ते जानेवारी या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यानंतर आता राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या निमित्ताने खास डबल गिफ्ट देण्यात येणार आहे.या आठ मार्चच्या महिला दिनाचं औचित्य साधत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार आणि मार्च महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे.
येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन देशासह राज्यभरात साजरा केला जाणार आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना सरकारकडून हे डबल गिफ्ट मिळणार असल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट ! महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा करण्यात येईल ! असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा होणार असले तरी ते फक्त निकषात बसणाऱ्या आणि पात्र महिलांच्या खात्यावरच येतील असं देखील महिला आणि बाल विकास मंत्री यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या नजरा आता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लागल्या आहेत.