धुळे : धुळे जिल्ह्यातील सोनगिरी येथील सरपंच रंजना मोरे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. सरकारी जागेवर घराचं बांधकाम करणं त्यांना चांगलंच भोवलं असून जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र म्हणून घोषित केल आहे.
ऑक्टोंबर 2023 मध्ये झालेल्या सोनगीर येथील वार्ड क्रमांक एकच्या पोट निवडणुकीत रंजना मोरे या विजयी झाल्या होत्या, जानेवारी 2024 मध्ये त्यांची सरपंचपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नामनिर्देशक पत्र भरताना त्यांनी स्वतःचे घर हे अतिक्रमण नसल्याचे नोंद केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या नावावर सोनगीर ग्रामपंचायतीच्या नोंदणीनुसार बांधकाम हे अतिक्रमण जागेवर असल्याची तक्रार माजी सरपंच असलेल्या रुक्मिणी ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीचा पाठपुरावा केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण असल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी रंजना मोरे यांना ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच म्हणून या पदावर राहण्यास अपात्र घोषित केले आहे.
विशेष म्हणजे एकाच पंचवार्षिक काळात येथे सरपंच अपात्र होण्याची ही दुसरी वेळ असून भावजया सरपंच विरोधात नणंदेने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारी जागेचा दुरुपयोग केल्यामुळे रंजना मोरे यांना आपल सरपंच पद गमाववं लागलं आहे.