पुणे : स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली. मात्र या घटनेनंतर अत्याचार झालेल्या तरुणीचा आवाज बस बाहेर आला की नाही? असा प्रश्न समोर येत होता. आता या प्रकरणी पोलिसांनी तज्ञांच्या मदतीने शास्त्रीय पद्धतीने तपासणी केली आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शिवशाही बसमध्ये वापरलेली दाट काच, वातानुकूलित रचना आणि बंद दरवाजांमुळे बाहेर आवाज पोहोचणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे पीडितेने आरडाओरड केल्यानंतरही कोणालाही त्याचा आवाज ऐकू गेला नाही, असा निष्कर्ष चाचणीमध्ये समोर आला आहे.ही बाब तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून आरोपीविरुद्ध मजबूत पुरावे सादर करताना या निष्कर्षाचा वापर केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या घटनेनंतर तपासाची दिशा वैज्ञानिक आधारावर नेली असून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.
या अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याला घटनेच्या तब्बल 70 तासानंतर अटक करण्यात आली होती.विशेष म्हणजे, गाडे याच्यावर यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद असून तो रेकॉर्डवरील आरोपी आहे.दरम्यान या अत्याचाराच्या घटनेनंतर नागरिकांचा संताप आणि समाजातील तणाव लक्षात घेता, या प्रकरणात पोलिसांनी दक्षता घेत तपास सुरू ठेवला आहे. या अत्याचार प्रकरणात धक्कादायक नवनवीन खुलासे समोर येत आहेत..