पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने होत असलेल्या आरोपानंतर अखेर धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या राजीनाम्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी विभागातून धनंजय मुंडे यांनी 200 कोटी रुपये उचलले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. याप्रकरणी ते ईडीला पत्र लिहिणार असल्यामुळे आता ईडी चौकशीचा फेरा धनंजय मुंडेंच्या मागे लागण्याची शक्यता आहे.
तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची 200 कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा आहे. दरम्यान या आधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर कृषी मंत्री असताना त्यांनी जवळपास 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारने योजना सुरू केली होती.या योजनेअंतर्गत कापूस गोळा करण्याच्या बॅग,नॅनो युरिया,नॅनो डीओबी, फवारणी पंप अशा वस्तूंची खरेदी करण्यात आली मात्र या वस्तूंची खरेदी बाजारभावापेक्षा महाग करण्यात आली.यामुळे कमी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात आला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. आता या कृषी घोटाळ्यातील आरोपामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत.
कृषी विभागातील घोटाळ्यामुळे राजीनामा दिल्यानंतर ही धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत.एकीकडे पत्नी करुणा मुंडे यांनी केलेले आरोप,संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यात नुकताच त्यांना बेल्स पालसी हा आजार, या सगळ्या प्रकारांनी ग्रासलेले असतानाच आता धनंजय मुंडे यांच्या मागे ईडी चौकशीचा फेरा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.