पुणे : राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. या योजनेतून आतापर्यंत जुलै ते जानेवारी या महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमाही करण्यात आले. त्यानंतर जागतिक महिला दिनी लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये दिले जाईल असे आश्वासन महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं होतं. मात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात आजच्या महिलादिनी फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला असल्याने महायुतीने लाडक्या बहिणींना ठेंगा दिला असल्याचं दिसून आलं आहे. आता मार्च महिन्याच्या हप्त्याचं काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
आज जागतिक महिला दिन आहे. या महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणीचीं फसवणूक या सरकारने केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र देणार असे आश्वासन देणाऱ्या या सरकारने लाडक्या बहिणींना ठेंगा दिला आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा हप्ता आता मिळणार का नाही?अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाईल असं आश्वासन देखील या सरकारने दिलं होतं. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी 2100 रुपये बाबत केलेल्या वक्तव्याने बहिणीची चांगलीच निराशा झाली. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेद्वारे 2100 रुपये देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही. राज्याची योजना सरकारकडून जाहीर केली जाते आणि हा जाहीरनामा पाच वर्षासाठी असतो,योग्य पद्धतीने त्या संदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ सूचित करेल त्यावेळी तसा प्रस्ताव शासनाकडे ठेवू असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे 2100 रुपयेचं आश्वासन देणाऱ्या या सरकारने लाडक्या बहिणीची फसवणूक केल्याच स्पष्ट दिसून येत आहे.