पुणे : गेल्या काही दिवसापासून राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत.अशातच आता पुणेकरांची पसंती असणाऱ्या ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्या नावाचा गैरवापर करून ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणेकरांची पसंती असणाऱ्या चितळेच्या नावाचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर चितळे स्वीट होमचे मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (२), ३५० व आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अर्जाची चौकशी केल्यानंतर, या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याप्रकरणीस्वीय सहायक म्हणून चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे चार वर्षांपासून नोकरी करत असलेल्या नितीन दळवी (वय ३५, रा. धनकवडी) यांनी तक्रार केली होती.
चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी आणि चितळे स्वीट होम यांची पुणेरी स्पेशल बाकरवडी या दोन्हीत तफावत आहे. पण पॅकिंगवर चितळे बंधू मिठाईवाले यांचा अधिकृत ई-मेल आयडी, ग्राहक क्रमांक (कंझ्युमर नंबर), मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स, संपर्क क्रमांक छापला होता. हा प्रकार करुन चितळे स्वीट होम हे त्यांची बाकरवडी ही चितळे बंधू मिठाईवाले यांचीच बाकरवडी असल्याचे भासवून विकत होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चितळे स्वीट होमच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या एक वर्षापासून चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी असल्याचे भासवून त्यांच्याकडून बाजारात ऑफलाइन आणि ऑनलाईन विक्री केली जात असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यानुसार पुणे पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.