अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील सौंदाळा हे गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेत असते. यावेळी देखील ग्रामसभेत आई व बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाने या गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला आहे. सौंदाळेत झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी गावामध्ये यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. जर शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकारण्यात येईल, असा निर्णय या गावातील नागरिकांनी घेतला आहे.
शिव्या देत असताना आईचा व बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शारीरिक अवयवा संदर्भात शिवीगाळ करून अर्वाच्य शब्द वापरून स्त्रीचा अपमान केला जात आहे. त्यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आपल्या आई बहिणींना मुलींना आठवले पाहिजे. त्यामुळे ग्रामपंचायतीने शिव्या देण्यासाठी बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येणार आहे, असं मस्त गावचे सरपंचांनी व्यक्त केलं आहे. माझ्या पंधरा वर्षाच्या कालावधीत या निर्णयासह अनेक निर्णयात्मक ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती लोकनियुक्त सरपंच शरद अरगडे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना शरद अरगडे म्हणाले की, आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून महिला भगिनींचा सन्मान करण्यासाठी हा ठराव घेतला आहे. यापुढे कोणीही शिवी दिली तरी त्याच्याकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. दंडाची वसुली ग्रामपंचायतीतून केली जाणार आहे. आमच्या ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय हा सर्वच ग्रामपंचायतींनी घ्यावा, असे आवाहन देखील शरद अरगडे यांनी केले आहे.