पुणे : पुणे शहरातील गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात एका तरुणाने बीएमडब्लू गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून रस्त्यातच लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. आता या घटनेवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ शेअर करत कारवाईची मागणी केली आहे.
यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “पुण्यात गुन्हेगारांची दादागिरी सुरूच….! पुण्यातील शास्त्रीनगर भर चौकात एका मद्यधुंद तरुणाने अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जागतिक महिला दिनाच्या सकाळीच घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. दारूच्या नशेत वेगाने गाडी चालवणं, रस्त्यावर अशोभनीय कृत्य करणं, त्यानंतर विरोध करणाऱ्या व्यक्तीला अश्लील हावभाव करणं – हा गुन्हा फक्त निबंध लिहून घेऊन पुन्हा पोलिसांनी माफ करू नये. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे!” असे वडेट्टीवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान या घटनेतील मुख्य आरोपी गौरव अहुजा याला पुणे पोलिसांनी सातारा येथून ताब्यात घेतल असून त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे. आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पोलीस किती वाजता त्याला हजर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.