पुणे : गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी -चिंचवड शहरातील वाकड ताथवडे परिसरात राहणारे नागरिक हवेच्या प्रदूषणामुळे आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे हैराण झाले आहेत. वारंवार पाठपुरावा करून देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेशविकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे. या प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढला. या मोर्चातून आपल्या मागण्या मांडल्या.
वाकड ताथवडे परिसरातील रहिवाशांच्या मागण्या काय?
1. या परिसरातील रस्त्यांची दोन वेळा यंत्राद्वारे पाण्याने साफसफाई करण्यात यावी.
2. रस्त्यावरील सिमेंट आणि खडी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यात यावं
3.धुळीचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी वॉटर स्प्रे प्रणाली राबविण्यात यावी
4.रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्यांची निगा राखण्यात यावी
वाकड ताथवडे परिसरात स्वच्छता राखली जात नसल्यामुळे धुळीचे प्रमाण अधिकच वाढले आहे. या परिसरात 15 ते 20 मोठ्या सोसायटीमध्ये पाच ते सात हजार रहिवासी राहतात त्यांच्या आरोग्यावर या प्रदूषणाचा मोठा दुष्परिणाम होत आहे. त्याचबरोबर या भागात असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढला.