पुणे : पुणे महापालिकेकडून मुख्य इमारतीसह इतर मालमत्तांच्या ठिकाणी पुरवल्या जाणाऱ्या कंत्राटी सुरक्षा रक्षक सेवेची मुदत संपल्यानंतर 139 कोटी 92 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता ही निविदा प्रक्रिया बेकायदा असल्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे ही प्रक्रिया थांबवावी अशी नोटीस एका नागरिकांनेच महापालिकेला पाठवली आहे.
यंदा पालिकेने दरवर्षीप्रमाणे एक वर्षासाठी नव्हे तर थेट तीन वर्षांसाठी निविदा प्रसिध्द केली आहे. या निविदा प्रक्रियेतील अटी-शर्थी या ठराविक ठेकेदारांनाच मिळतील, अशा पद्धतीने ठेवण्यात आल्या आहेत. राजकीय व्यक्तींच्या जवळच्या ठेकेदारांना या निविदा देण्यासाठीच ही ‘फिल्डींग’ लावली गेल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यानुसार ही प्रक्रिया थांबवावी यासाठी वसीम तोफिक शेख (रा. प्लॉट नं.4, मंगळवार पेठ पुणे) यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे व दाखविलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करुन अॅड असोसिएट्सचे अॅड. असीम सरोदे यांच्याकडून पालिकेच्या सुरक्षा विभागाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
सिक्युरिटी गार्ड नेमण्याची किंवा त्यासंदर्भातील काम इतरांना देतांना ‘महाराष्ट्र राज्य सेक्युरिटी गार्ड बोर्ड’ च्या नियम, कंत्राटी मजूर कायदा या तरतुदींच्या नुसार कामकाज करणे कायद्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. ज्या संस्थांची ईएसआयनुसार नोंदणी आहे, किमान वेतन संदर्भात तरतुदींना ज्या संस्था बांधील आहेत, त्यांचा सहभाग सिक्युरिटी गार्ड संदर्भातील काम देतांना विचारात घेणे आवश्यक आहे. असा दावा नोटीस देणाऱ्या नागरिकाने केला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवावी असेही त्यात म्हटल आहे. दरम्यान प्री-बीड मिटिंगमध्ये या निविदा प्रक्रियेतील अटी शर्ती बदलता येतील असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल आहे.