पोपट पाचंगे
रांजणगाव : परिसरात पाण्याअभावी पिके जळू लागल्याने चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती,शेतकऱ्यांची गरज ओळखून डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले, यामुळे काही प्रमाणात का होईना पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, वाघाळे, गणेगांव खालसा, खंडाळे, पिंपरी दुमाला व वरुडे या गावांसह कोंढापुरी तलावात शेतीसह नळपाणीपुरवठा योजनेसाठी पाणी सोडण्यात येत असते. उन्हाची तीव्रता वाढल्याने पिकांना पाण्याची गरज ओळखून पाणी डाव्या कालव्याला सोडण्याची मागणी आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांसह परिसरातील शेतकरी व नागरिकांनी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती.
या मागणीनुसार नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याची गरज ओळखून डाव्या कालव्याद्वारे मागील काही दिवसांपासून आवर्तन रांजणगाव गणपती परिसरात सुरु असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.