चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून आता गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला करण्याची धमक दाखवली आहे. चंद्रपूर शहरातील पठाणपुरा परिसरात टोळीकडून पोलिसांवरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एका पोलिसाचा जागीच पडून मृत्यू झाला आहे तर दुसरा पोलीस गंभीररित्या जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या आणि बदनाम गल्ली म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या पठाणपुरा गेटच्या आत पिंक पॅराडाईज बारमध्ये दोन पोलीस कर्मचारी बसले होते. त्यावेळी त्यांचा युवकासोबत वाद झाला.या वादाचे रूपांतर मारहानीत झाले त्यानंतर या युवकाने काही जणांना सोबत घेत पोलिसांवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरे पोलीस कर्मचारी संदीप चाफले गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा खून झाल्यानंतर आरोपीनं स्वत: पोलीस ठाण्यात सरेंडर केल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
विशेष म्हणजे, हा परिसर अनेक अवैध हालचालीनीं बदनाम आहे आणि यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पोलिसांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण आला असून आता पोलिसांसाठी ही संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे.