पुणे : भर रस्त्यात रात्री बाराच्या ठोक्याला सांगवी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी चार गुन्हेगार उपस्थित होते. या गुन्हेगारांकडून पोलिसांच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील यांच्यासह अन्य सहकारी पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्यासमोर गुन्हेगांरासोबत बर्थडे सेलिब्रेशन करणं पोलीस अंमलदाराला चांगलेच महागात पडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री बाराच्या ठोक्याला पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्याच्या दारातच रस्त्यावर टेबल लावण्यात आले. त्यावर केक मांडून फटाके फोडण्यात आले. दोघांनी फटाक्यांची फायर गन बाहेर काढली दुसरीकडे स्काय शॉट आणि बॉम्ब फुटू लागले. ही आतिश बाजी बराच वेळ सुरू होती.एवढेच नव्हे तर या ‘सोहळ्या’साठी ड्रोनची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती. त्यांच्या या कृत्याची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली आहे. शिस्तभंग झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेले अंमलदार विवेक गायकवाड,सुहास डंगारे, विजय मोरे यांचे देखील तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे.