पुणे : महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने महाशिवरात्र उत्सवात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा “शिवार्पणमस्तू’ कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमावर माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. यानंतर आता त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मोठा निर्णय घेतला असून सर्व कार्यक्रम नियोजनानुसारच होणार असून त्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा “शिवार्पणमस्तू’ कार्यक्रम ही पार पडणार असल्याचे जाहीर केल आहे.
महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आल आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्ट मात्र प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर ठाम आहे त्यानुसार सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होतील, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं ट्रस्टनं स्पष्ट सांगितल आहे. दरम्यान आज पालखी दरम्यान शिव तांडव ग्रुप तर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण, सायंकाळी नटरंग अकॅडमी प्रस्तुत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा ‘शिवार्पणमस्तू’ नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. उद्या, गुरुवारी ओम नटराज अकॅडमी व दीक्षीत यांचे सांस्कृतिक कथक नृत्य सादर होणार आहे. दरम्यान भाविकांनी धार्मिक कार्यक्रमात सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असा आवाहन त्रंबकेश्वर देवस्थानच्या वतीने करण्यात आला आहे.
महाशिवरात्रीला देशभरातून लाखोच्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होत असतात. सर्व भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिर 41 तास पुढे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या भाविकांसाठी राज्यमार्ग परिवहन महामंडळाने 25 ते 26 फेब्रुवारी दरम्यान 45 जादा बस सोडण्याच नियोजन देखील केला आहे. याचबरोबर मंदिर आणि परिसरात गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने तयारी देखील करण्यात आली आहे.