पुणे ; महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर महा कुंभमेळ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने लाखो भाविकांनी प्रयागराज येथे पवित्र स्नानासाठी तुफान गर्दी केली आहे. या त्रिवेणी संगमात रात्री उशिरापासून भाविकांनी पवित्र स्नान करण्यास सुरुवात केली होती परंतु ब्रह्म मुहूर्तावर स्नान करण्यासाठी श्रद्धाळू मोठ्या संख्येने संगमावर जमत आहेत.या महाशिवरात्रीनिमित्त सुमारे २ ते ३ कोटी लोक स्नान करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाशिवरात्रीचे औचित्य साधून महाकुंभ मेळाव्यातील स्नानाचा आजपर्यंतचा आकडा ६७ ते ६८ कोटींच्या जवळपास पोहोचू शकतो. या महा कुंभमेळ्यात कोणतीही चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता प्रशासनाकडुन प्रयत्न करण्यात आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी चार वाजल्यापासून शहरात येणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
या महा कुंभमेळ्याच्या त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी दक्षिण झुंसीहून येणारे भाविक संगम द्वार ऐरावत घाटावर स्नान करू शकतात. तर उत्तर झुंसीहून येणारे भाविक संगम हरिश्चंद्र घाट आणि संगम जुना जीटी घाट येथे स्नान करू शकतात. तसेच, संगम द्वार भारद्वाज घाट, संगम द्वार नागवासुकी घाट, संगम द्वार मोरी घाट, संगम द्वार काली घाट, संगम द्वार राम घाट आणि संगम द्वार हनुमान घाट येथे भाविक स्नान करू शकतात.
याआधी सोमवारी १.३० कोटींहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केलं. मंगळवारीही १.११ कोटींहून अधिक लोक त्रिवेणी संगमावर पोहोचले होते. १३ जानेवारीपासून ६५ कोटी भाविकांनी महाकुंभ मेळाव्यात स्नान केलं आहे. आज या महा कुंभमेळ्याचा समारोप होणार आहे, त्यामुळे आजचा दिवस हा खास असणार आहे.