पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील मराठी भाषेबाबतच्या केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या या विधानाचे पडसाद विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही उमटले आहेत. वादग्रस्त वक्तव्याच्या 20 तासानंतर भैय्याजी जोशी यांनी यूटर्न घेत माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला असल्याचं म्हटलं आहे.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, मी केलेल्या विधानामुळे गैरसमज झाला आहे असे मला वाटते. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे,मुंबई ही पण महाराष्ट्राचाच भाग आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राची मराठी हीच भाषा आहे.. त्यामुळे भारताचे एक वैशिष्ट्य आहे विविध भाषा बोलणारे लोक परस्परांना बरोबर घेऊन चालतात. भाषेमुळे कुठेही प्रश्न निर्माण होत नाहीत म्हणूनच जगापुढेही आदर्श उदाहरण आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सर कार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी बोलताना मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही.इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजरात आहे,मुंबईची कुठलीही एक भाषा नाही इथे अनेक भाषा बोलल्या जातात असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला. दरम्यान या वक्तव्यानंतर 20 तासानंतर लगेच त्यांनी युटर्न घेत स्पष्टीकरण दिलं आहे.