बापू मुळीक
सासवड : भिवरी (ता. पुरंदर) येथील अमृता दादासो कटके ही आपल्या मेहनतीच्या व कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पुरंदरची सुवर्णकन्या ठरली आहे. अमृताला लहानपणापासूनच खेळाची प्रचंड आवड होती सुरुवातीला कानिफनाथ विद्यालय भिवरी येथे शिक्षण घेत होती. यावेळी वडील दादासो कटके व क्रीडा शिक्षक मधुसूदन शेंडकर यांनी तिच्यातील गोळा फेक खेळातील कौशल्य ओळखून तिला या खेळात मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.
पहिल्याच वर्षी तिने राज्य पातळीपर्यंत झेप घेतली. तिच्यातील ही क्षमता ओळखून घरच्यांनी तिला लखविंदर सिंग या मार्गदर्शकाकडे पाठवून दिले. तिथे तिच्या तंत्रशुद्ध शिक्षणाची सुरुवात झाली. पुढील वर्षी तिरुपती येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली.
आत्तापर्यंत जिद्दीने तिने राष्ट्रीय स्पर्धा खेळली आहे. गेल्या वर्षी थोडक्यात हुकलेले पदक यावर्षी कोणत्याही परिस्थितीत मिळवायचेच ही जिद्द ठेवूनच राची (झारखंड) येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत ती सहभागी झाली. तेथे तिने सुवर्णपदक पटकावत तिच्यावरील विश्वास सार्थ करून दाखविला. अमृताचे पुढील ध्येय चार वर्षांनंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे असून, त्यासाठी ती कसून सराव करत आहे.