पुणे : स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झालेल्या घटनेने पुण्यासह राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या अत्याचाराच्या घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडवर आलं असून राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एसटी परिवहन मंडळाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळात एक सुरक्षा रक्षक कमिटी नेमून त्यात आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमणार असल्याची माहिती समोर आली आहे.
स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एसटी महामंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत विस्तृत आढावा घेण्यात आला. येथील सुरक्षा कर्मचारी वाढवणे यासोबतच एसटी महामंडळात यापुढे आयपीएस अधिकारी नेमण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अत्याचाराच्या घटनेने बस स्थानकावरील महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्या अनुषंगाने मंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांशी देखील चर्चा केली.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी एसटी बस स्थानकाच्या आवारात तक्रार निवारण कक्ष, तक्रार नोंदवण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक राज्यात दिला जाईल. तसेच खाजगी बस चालकांची एसटी स्थानकात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी देखील उपाय योजना आखण्याचे निर्देश राज्यमंत्री मिसाळ यांनी बैठकीत दिले. या अत्याचाराच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्यामुळे महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करण्याची गरज आहे त्या तात्काळ करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणाच्या ऑडिटमध्ये जे कोणी अधिकारी किंवा ठेकेदार दोषी असतील त्यांच्यावरही कठोर कारवाई करणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितलं