पुणे : पुणे शहराचे दक्षिण प्रवेशद्वार मानले जाणाऱ्या कात्रज चौकात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता महापालिकेला तब्बल 28 वर्षानंतर यश आले आहे. जागा मालकांकडून एक एकर जागेचा ताबा राज्य सरकारकडे आणि सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे देण्यात आला आहे. त्यामुळे कात्रज चौक खऱ्या अर्थाने आता मोकळा श्वास घेणार आहे.
कात्रज चौकातील संजय गुगळे यांची सुमारे एक एकर जागा ताब्यात घेतली असून त्यासाठी 21 कोटी सत्तावन्न लाख 60 हजार रुपये देण्यात आले आहेत. त्यानंतर ही प्रक्रिया पार पडली आहे.या जागेत कात्रज कोंढवा आणि पुणे सातारा मार्गाचा समावेश आहे. दरम्यान या जागेच्या संपादनासाठी आयुक्त राजेंद्र भोसले,अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. यांच्यासह माजी आयुक्त विक्रम कुमार,माजी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पद विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर त्यांचंही विशेष प्रयत्न होते. दरम्यान यामुळे कात्रज मुख्य चौकातील रस्ता सरळ होणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मार्गे लागणार आहे.
या जागेबाबत जागामालक संजय गुगळे यांनीही गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न रखडला असल्यान सामंजस्यातून आम्ही जागेचा ताबा दिला आहे. काही अडचणीमुळे अनेक वर्ष स्थानिकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता मात्र जागेचा ताबा दिला असल्याने महापालिकेला रस्ता सुरुवात करण्यास कोणतीही अडचण नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे आता वाहतूक कोंडीतून मुक्त होऊन कात्रज चौक खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेणार आहे.