हनुमंत चिकणे
इंदापूर : पुणे सोलापूर महामार्गावरील राजवडी (इंदापूर) हद्दीतील उड्डाणपुलाखाली प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून अवैधरीत्या पेट्रोलची विक्री करीत असल्याच्या कारणावरून दोघांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 5 हजार 460 रुपयांच्या एकूण 42 पेट्रोलने भरलेल्या प्लॅस्टीकच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.
हनुमंत कोंडिबा मोरे (वय 61, व्यवसाय कुलपी विक्री, रा. बिजवडी, ता. इंदापूर) व तुकाराम लक्ष्मण गेंड (वय 58, व्यवसाय फळविक्री, रा. बिजवडी, ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गुलाब माने यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत मोरे हे कुलपी विक्री तर तुकाराम गेंड हे फळविक्री करतात. शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजता राजवडी येथे सोलापुर महामार्गाच्या पुलाखाली एक लिटर मापाच्या प्लॅस्टीकच्या पाण्याच्या बाटल्यामध्ये पेट्रोल भरून बेकायदेशीररीत्या 130 रुपये लिटरने विक्री करताना मिळून आले.
दरम्यान, त्यांच्याकडून एक लिटर पेट्रोलने भरलेल्या 5 हजार 460 रुपयांच्या एकूण 42 प्लॅस्टीकच्या बाटल्या मिळून आल्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस हवालदार काळे करीत आहेत.