हनुमंत चिकणे
पुणे : भोसरी पोलीस ठाण्यात 2012 साली दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न व इतर गुन्ह्यातून 5 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या कोर्टाने आरोपींच्या विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने त्याना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले आहेत. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. विपुल दुशिंग व ॲड. नितीन भालेराव यांनी दिली. दया गुरने, श्रीमंत गुरने, अभिजित भालेराव, सागर गायकवाड, विजय भालेराव असे निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींचे नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर 2012 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वरील आरोपींनी सुशांत भंडारी यास दापोडी रेल्वे ब्रिजच्या खाली कोयते व हत्यारानी डोक्यात मारहाण केली होती. या मारहाणीत सुशांत हा बेशुद्ध झाला होता. वस्तीतील नागरिकांनी आरडाओरड केल्यामुळे आरोपी तेथून पळून गेले होते.
घटनेची खबर जखमी सुशांतच्या भावास कळाल्याने तो तेथे आला व सुशांत यास वाय. सी.एम. रुग्णालयात घेऊन गेला. त्यानंतर प्रशांत भंडारी याने भोसरी पोलिसात भावाच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या बाबत आरोपींच्या विरुद्ध फिर्याद दिली होती. त्या वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता व तपासादरम्यान आरोपीला अटक करून आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
सदर केस मधे सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी तर्फे ॲड. विपुल दुशिंग व ॲड.नितीन भालेराव यांनी केसचे कामकाज केले ॲड. नितीन भालेराव यांनी सर्व आरोपींच्या तर्फे युक्तिवाद केला. केस मधील फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या जबाबात विसंगती असल्याचे आरोपीतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, सरकारी वकील आणि आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी आरोपींच्या विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने त्याना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले. या वेळी ॲड. मयूर चौधरी यांनी मदत केली