सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या उन्हापासून आराम मिळवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण काहीना काही उपाय करत असतील. त्यात फुल बाह्यांचे सुती आणि सैल कपडे असो किंवा गॉगल यांसारख्या गोष्टींचा वापर केला जातो. त्यात आरोग्याच्या दृष्टीने थंडावा मिळावा म्हणून लिंबू सरबत, ताक, लस्सी यांचा समावेश होतो. त्यात ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. याचीच माहिती आपण आज घेणार आहोत.
ताक हे फक्त उन्हाळ्यातच नाहीतर दररोजही पिता येऊ शकते. या ताकामुळे अनेक समस्या दूर होऊ शकतात. ताक हे पचायला सोपे असते. त्याची चव हलकी तुरट आणि आंबट असते आणि ती उष्ण असते. ताक पचनक्रिया सुधारते आणि कफ, वात दोष संतुलित करते. जळजळ, पचन समस्या, पोटाचे आजार, भूक न लागणे आणि अशक्तपणा (रक्ताची कमतरता) यांवरही ताक गुणकारी मानले जाते. उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि त्यामुळे शरीर थंड राहते. त्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला हायड्रेट ठेवतात आणि थकवा दूर करतात.
ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स (चांगले बॅक्टेरिया) शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.
ताक पोटातील ॲसिड नियंत्रित करते. त्यामुळे ॲसिडिटी आणि अल्सरची समस्या कमी होते. ताक पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. अपचन, गॅस, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्या दूर करते.