पुणे : आपल्या नृत्यामुळे आणि दिलखेच अदामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. आता गौतमी टेलिव्हिजनवर एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा 3’ मध्ये गौतमीची एन्ट्री होणार आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा’ शो लवकरच 100 भाग पूर्ण करणार आहे. याच निमित्ताने गौतमीचा खास परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे.
पहिल्या पर्वापासून आता होऊ दे धिंगाणाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधवचं खुमासदार सूत्रसंचालन आणि प्रवाह परिवाराचा सळसळता उत्साह हे या कार्यक्रमाचं ख-या अर्थाने वेगळेपण.
‘टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच…’ असे म्हणत स्टार प्रवाहच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर गौतमीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ‘सबसे कातिल मी गौतमी पाटील’ या गाण्यावर ती लावणी सादर करताना दिसली. ‘नृत्यांगना गौतमी पाटील थिरकणार धिंगाणाच्या मंचावर…’ असे कॅप्शन देत हा प्रोमो शेअर केला आहे. यावेळी स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांमधील सदस्य आणि कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सिद्धार्थ जाधव गौतमीच्या परफॉर्मन्स एन्जॉय करताना दिसले.