मुंबई : सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. संपूर्ण महाराष्ट्र्रला हसवणारा आणि बिग बॉस मराठीच्या 5 व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. नुकताच केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.
‘झापुक झुपूक’ सिनेमातून झळकणार
सूरज चव्हाण हा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतच त्याने बिग बॉसच्या पर्वातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यात त्याने लाखो चाहत्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर तो पुन्हा एकदा ‘झापुक झुपूक’ या त्याच्या पहिल्या मराठी सिनेमात झळकणार आहे. त्याच्या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
मार्केट गाजवायला अन् पोरीला लाजवायला
बिग बॉस स्टार सूरज चव्हाण आपल्या अनेक डायलॉगसाठी प्रसिद्ध आहे. “मार्केट गाजवायला अन् पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम आहे”, हा त्याचा डायलॉग प्रसिद्ध आहे. नुकत्याच दमदार टीझरमध्ये ‘झापुक झुपूक’ सिनेमाची झलक पाहायला मिळते. टीझरमध्ये सूरजने कॉमेडी, त्याची हटके स्टाईल आणि त्याचा भन्नाट अभिनय यातून सिनेमामध्ये प्रचंड धम्माल पाहायला मिळणार आहे.
सूरज चव्हाणचा झापूक झुपुक हा सिनेमा जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शित 25 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.