पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या ऑनलाईन अर्जात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम आयोगाकडून सुविधा केंद्र, ई-मेलच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा. विहित मुदतीनंतर सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे आयोगाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आहे. त्यामुळे मुख्य परीक्षा निर्धारित तारखेलाच होणार हे स्पष्ट झाले.
राज्यसेवेची मुख्य परीक्षा येत्या २६, २७ व २८ एप्रिल रोजी होत आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करताना प्रवर्ग बदलण्याचा पर्याय स्वीकारला जात नसल्याची तक्रार उमेदवारांनी केली होती. मुदत संपत आली, तरी अर्ज सादर करता येत नसल्याने आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी आणि अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली.
आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटल्यानुसार, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र एकूण ७ हजार ९७० उमेदवारांपैकी ९एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ७३२ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. उर्वरित पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरता ऑनलाईन अर्जप्रणाली सुरळीत सुरू आहे. उमेदवारांच्या अडचणी, शंकांचे निराकरण हे सुविधा केंद्र (हेल्पडेस्क) व आयोगाच्या कार्यालयाकडून केले जात आहे. ज्या उमेदवारांना अडचणी किंवा शंका असतील, अशा उमेदवारांनी सुविधा केंद्राच्या दूरध्वनी
क्रमांकावर किंवा आयोगाच्या कार्यालयाच्या ई-मेलवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी विहित कालावधीतच अर्ज सादर करण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. मुदतीनंतर आलेल्या अर्ज व परीक्षा शुल्काचा भरणा करण्यासंदर्भांतील विनंतीचा विचार केला जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले.