मुंबई: कोविड महामारीनंतर लक्झरी घरांची मागणी सातत्याने वाढत आहे. परिणामी, देशाच्या विविध शहरांमध्ये नवीन लॉन्च आणि महागड्या घरांच्या विक्रीचा विक्रम होत असून घरांच्या किमतींच्या सवलतीची उड्डाणे सुरू आहेत. याचा परिणाम म्हणजे देशात अव्वल सात शहरांमधील घरांची सरासरी किंमत विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये २३ टक्क्यांनी वाढून १.२३ कोटी रुपये झाली आहे. आधीच्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हीच किंमत एक कोटी रुपये होती, असे अनारीक समूहाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.
देशातील अव्वल सात शहरांमध्ये एनसीआरमधील घरांच्या किमती वार्षिक आधारावर ५५ टक्क्यांनी वाढून त्या मागील आर्थिक वर्षातल्या पहिल्या सहामाहीतील ९३ लाख रुपयांवरून १.४५ कोटी रुपयांवर गेली आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ३०,१५४ कोटी रुपये मूल्याच्या सुमारे ३२ हजार ३१५ घरांची विक्री झाली. त्याचवेळी आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ४६ हजार ६११ कोटी रुपयांच्या सुमारे ३२ हजार १२० घरांची विक्री झाली आहे. या कालावधीत विक्री केलेल्या इन्व्हेंटरीचे मूल्य ५५ टक्क्यांनी वाढले.
बंगळुरू ४४ टक्के किंमत वाढीसह पहिल्या ७ शहरांमध्ये सरासरी घरांच्या किमतींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे अहवालात म्हटले आहे. या किमती २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील ८४ लाख रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत १.२१ कोटी रुपयांवर गेल्या आहेत. २०२४ आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत शहरात २६ हजार २७४ कोटी रुपये मूल्याच्या सुमारे ३१ हजार ४४० घरांची विक्री झाली. हैदराबादमधील घरांच्या सरासरी किमती ३७ टक्क्यांनी ८४ लाख रुपयांवरून १.१५ कोटी रुपयांपर्यंत वाढल्या, चेन्नईमध्ये घरांच्या किमती ३१ टक्क्यांनी वाढून ७२ लाख रुपयांवरून ९५ लाख रुपयांवर झाल्या, पुण्यात ३१ टक्क्यांनी वाढून ६६ लाख रुपयांवरून ७२ लाख रुपये झाल्या. कोलकात्यात १६ टक्क्यांनी वाढून ५३ लाख रुपयांवरून ६१ लाख रुपये झाल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) घरांच्या सरासरी किमतीत गेल्या वर्षभरात कोणतीही वाढ झालेली नाही.
घरांच्या एकूण विक्रीत ३ टक्क्यांनी घट झाली असली, तरी एकूण विक्री किंमत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत १८ टक्के जास्त आहे, यावरून देशात लक्झरी घरांची मागणी वाढत असल्याचे दिसून येते, असे अनारोक समूहाचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले.