नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यात बुधवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचे दर गगनाला भिडले. हा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 98100 रुपयांचा सर्वकालीन उच्चांकी दर गाठला. एकाच दिवसात या सोन्याच्या किमतीत 1650 रुपयांची वाढ झाली. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापारी तणावानंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.
‘ऑल इंडिया सराफा असोसिएशन’च्या मते, मंगळवारी 99.9 % शुद्धतेच्या सोन्याचे दर 96450 रुपयांवर बंद झाले होते. बुधवारी त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98100 रुपयांवर पोहोचली. आता ते हे दर एक लाख रुपयापासून फक्त 1900 रुपये कमी आहे. सोन्यातील दरवाढीचा आलेख पाहता ही पातळी आता फार दूर असल्याचे दिसत नाही. 99.5 % शुद्धता असलेल्या सोन्याचा भावही 97650 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला आहे. जो मागील दिवशी 96000 रुपयांवरून वाढला होता.
चांदीच्या किमतीतही अशीच वाढ दिसून आली. चांदी 1900 रुपयांनी वाढून 99400 रुपये प्रति किलो झाला. मंगळवारी ही चांदी 97500 रुपयांवर होती. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट गोल्डन प्रति औंस $३,३१८ या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 94600 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने वाढली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 86560 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 97500 रुपयांवर गेले आहेत.