नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक अशी ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना एक विशेष अशी भेट दिली आहे. बँकेने महिला उद्योजकांना कमी व्याजदरासह विना गॅरंटी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. SBI ने महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘अस्मिता’ नावाचे फीचर लाँच केले आहे. त्याचा उद्देश महिलांना कमी व्याजदरात पैसे उपलब्ध करून देण्याचा आहे.
नवीन ऑफरमुळे महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म, लघु आणि मध्यम युनिट्सना लवकर आणि अगदी सहज कर्ज मिळू शकणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने रुपे आधारित ‘नारी शक्ती’ प्लॅटिनम डेबिट कार्ड देखील आणले आहे. जे विशेषतः महिलांसाठी डिझाईन केले गेले आहे. तर दुसरीकडे, ‘बँक ऑफ बडोदा’ने भारतीय वंशांच्या महिलांसाठी ‘बॉब ग्लोबल वुमन एनआरई आणि एनआरओ बचत खाते’ सुरू केले. यामध्ये खातेदारांना ठेवींवर जास्त व्याज, कमी प्रक्रिया शुल्कासह गृहकर्ज आणि वाहन कर्ज आणि लॉकर भाड्यात सूट देण्यात येणार आहे.
महिला खातेदारांसाठी असे खाते सुरू करणारी बँक ऑफ बडोदा ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक असणार आहे. या खात्यातील कर्जावरील प्रक्रिया शुल्कही कमी असणार आहे. बँकेने प्रमुख NRI ऑफरपैकी एक, बॉब प्रीमियम NRE आणि NRO बचत खाते सुधारित केले आहे. यासह, ग्राहकांना अधिक फायदेशीर बँकिंग अनुभव देण्यासाठी त्याच्या फीचर्समध्ये वाढ केली आहे.