गोरख जाधव
डोर्लेवाडी : येथील न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दारूच्या बाटल्या उचलण्याची वेळ आली असून रोजच शिक्षणाच्या दारी तळीरामाच्या पार्ट्या जोरात सुरू आहेत. गावातील उन्नाड तळीरामांचा गावकारभाऱ्याच्या नाकावर टिच्चून दारूच्या पार्ट्या जोरात सुरू असून या तळीरामामुळे शिक्षकासह पालकही हतबल झाले आहेत. मात्र सदरील प्रकरणी शाळेचे मुख्यध्यापक यांचे दुर्लक्ष होत असल्याने शाळेचे विषय चव्हाट्यावर येत आहे.
यावर शिक्षण विभागही कारवाई करत नाही अन् स्थानिक नेत्यांना व ग्रामपंचायतीला याचे काहीच सोयरसुतक उरलेले नाही. रोज शाळेच्या मुख्य दारातच दारूच्या बाटल्याचे दर्शन होत असून शाळेच्या वर्ग खोल्यात दारूचा उग्र वास घोंघावतोय. यामुळे आम्ही इथे शिक्षण घेतो हाच आमचा गुन्हा काय ? असे विद्यार्थी बोलत आहेत. सदरील घटना वारंवार शाळेत घडत आहेत मात्र शाळेचे मुख्याध्यापक मुग गिळून गप्प आहेत. याबाबत कोणतीही माहिती देत नसल्याचे नागरिक बोलत आहेत.
डोर्लेवाडी परिसरातील दारूड्यांनी उच्छाद मांडला असून रोज शाळेच्या मुख्य दरवाज्याशेजारी व शाळेच्या आवारात अंधाराचा फायदा घेत ठिकठिकाणी दारूच्या पार्ट्या करून दारूच्या बाटल्या मैदानावर फोडून टाकत असल्याने त्या काचामुळे विद्यार्थ्यांच्या पायाला व हाताला मोठी इजा होत आहे. सदरचे विद्यामंदिर हे तळीरामांचे आश्रयस्थान बनत चालले आहे व शाळेच्या मुलांच्या व मुलींच्या शौचालयात प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरात कुत्राचा सुळसुळाट असल्याचेही दिसत आहे. परिणामी प्रचंड दुर्गंधी पसरल्याने चिमुरड्यांचे आरोग्य धोक्यात तर आलेच आहे. परंतु तळीरामांच्या आश्रयस्थानामुळे त्यांच्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दारूड्यांवर कडक कारवाईची मागणी..!
संध्याकाळ होताच गावातील काही उनाड टोळके हे शाळेच्या आवारातच बसून दारूच्या पार्ट्या रंगवत असल्यामुळे शाळेला एखाद्या दारूअड्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. अशा तळीरामावर शिक्षण विभागाकडून व पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली तरच या पार्ट्या बंद होतील अन्यथा याचा त्रास विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कायम होणार आहे. या किळसवाण्या प्रकराची गंभीर दखल घेणे गरजेचे होऊन बसले आहे. डोर्लेवाडी शालेय आवारात तळीरामांनी याठिकाणी मद्य सेवन करून त्याचठिकाणी रिकाम्या बाटल्या फोडून फेकल्या जातात. बाटल्या, शौच, हे बाथरूम मध्ये केल्याने विध्यार्थ्यांना बाहेर उघड्यावर बाथरूमला जावे लागत आहे. बाथरूमच्या जवळच शाळेच्या वर्ग खोल्या असल्यामुळे त्या वर्गातील विद्यार्थ्याना हा त्रास सहन करावा लागत आहे.
शौचालय ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा स्थितीत..!
शाळेच्या आवारात मुलांच्या व मुलींच्या बाथरूम मध्ये पाण्याची सोय व मुलांना शौचालायची सोय नाही त्यामुळे बाथरूम मधेच शौचास बसल्याचे दिसून आले व या ठिकाणी पाणी नसल्याने खूप दुर्गंधी पसरल्याचे दिसून येत आहे. मुलींच्या ही बाथरूम मध्ये पाण्याचे नळ व पाणी नसल्याने तिथे ही दुर्गंधी पसरलेली आहे.व मुलीना ही शौचालयाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची खूप अडचण होत आहे. व मुलांच्या बाथरूम मध्ये शौचास बसल्यामुळे या ठिकाणी सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. व मुलांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. ठिकाणी अतिशय घाणीचे, साम्राज्य तयार होऊन दुर्गंधी परसत आहे.