कोलकाता : सहारा इंडिया आणि त्यांच्या समूहाच्या संस्थांविरुद्ध कोलकाता येथील ईडीनं मोठी कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालयाने केलेल्या या कारवाईत लोणावळा येथील ॲम्बी व्हॅली सिटी मधील 707 एकरची जमीन जप्त करण्यात आली आहे. ही जमीन बेनामी नावाने खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
लोणावळ्यातील ॲम्बी व्हॅली सिटीमधील या जागेची अंदाजे बाजार भाव किंमत 1460 कोटी रुपये आहे. सहारा ग्रुपच्या विविध कंपन्याकडून घेतलेल्या पैशांचा वापर करून बेनामी नावाने ही जमीन खरेदी करण्यात आली होती असं ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल आहे.याची खरी मालकी लपवण्यासाठी बनावट नावांनी नोंदणी करण्यात आली होती, अशी देखील माहिती समोर आली आहे.
सहासा समुहावर कारवाई करताना ईडीने पीएमएलएच्या कलम 17 अन्वये शोधमोहिम राबवत यादरम्यान 2.98 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकडसुद्धा जप्त केली. सहारा ग्रुपच्या कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित लोकांविरुद्ध 500 हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले असून यापैकी 300 हून अधिक प्रकरणे पीएमएलए अंतर्गत नोंदविण्यात आली आहेत.