इंदापूर, (पुणे) : ‘मला तू आळखले नाहीस का? मी इथला दादा आहे. तू आमच्याकडून पैसे घेतले तर तुझा टोलनाका बंद करून टाकीन,’ अशी धमकी देऊन दोघांनी सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला लाथाबुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोघांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक ओमकार मेटे (रा. उजनी, ता. माढा, जि. सोलापूर) व विशाल लोकरे (रा. शिराळ, ता. माढा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी शरद छगन जाधव (वय – 31, रा. सरडेवाडी) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद जाधव हे सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील टोल नाक्यावर सुपरवायझरचे काम करतात. मंगळवारी (ता. 06) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाका लेन नंबर-3 वर चालक ओमकार मेटे याला ‘तुमचे गाडीचे फास्टटॅग रिचार्ज संपलेले असून, टोल पास होण्याचे पैसे भरून घ्या,’ असे सांगितले.
यावेळी ओमकार याने, ‘मला तू आळखले नाहीस का? मी इथला दादा आहे. तू आमच्याकडून पैसे घेतले तर तुझा टोलनाका बंद करून टाकीन,’ अशी धमकी देऊन त्यांची गाडी लेन नंबर ३ वर उभी करून सार्वजनिक वाहतूक जागीच ठप्प करून लाथाबुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच, विशाल लोकरे यानेही गाडी अडवली म्हणून फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून तेथून निघून गेले.
दरम्यान, या दोघांविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात सार्वजनिक वाहतूक ठप्प व कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार सचिन बोराडे करत आहेत.